बाबासाहेबांना कोणत्याही क्षुद्र गोष्टींचे कधी आकर्षणच नव्हते. जे अर्थपूर्ण, जे सर्वश्रेष्ठ आणि जे कल्याणकारी त्याचा जणू ध्यासच त्यांच्या मनाने घेतलेला होता. त्यांच्या काळात जगातील एक श्रेष्ठ दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून एडविन आरए.सेलिग्मन प्रसिद्ध होते. ते तर त्यांचे शिक्षकच होते. त्यांच्याकडून अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा कण न कण ग्रहण करण्यासाठी बाबासाहेब त्यांच्या प्रत्येक व्याख्यानमाला कसे अक्षरश: धावत जात होते हे त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवलेले आहे. सेलिग्मन यांनी बाबासाहेबांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार प्रसिद्ध आहेत. डॉ. ए.ए. गोल्डनविजर हे मानववंशशास्त्रातील एस असेच प्रसिद्ध नाव. त्यांचे चर्चासत्र त्याकाळात जगप्रसिद्ध आणि त्यात आपला प्रबंध सादर करण्याची विशेष प्रतिष्ठेची बाब समजली जात होती. बाबासाहेबानी ती प्रतिष्ठा वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांच्या चर्चासत्रात प्रबंध वाचून मिळविली.’जातिसंस्थेचा उगम,विकास आणि तंत्र’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधामुळे मानववंशशास्त्रातील डॉ केतकरांच्यासहित अनेक अभ्यासकांना बाबासाहेबानी चकित करून टाकले. त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात बट्रॉर्ड रसेल हे नाव जगात अग्रगण्य होते. रसेल यांचा दि प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालेला होता. बाबासाहेबानी इंडियन इकॉनॉमिक सोसायटीच्या जर्नलमध्ये त्याचे १९१८ रसेल अँड दि रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी या नावाने परीक्षण लिहिले होते. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील रसेल यांच्या चाहत्यांचे लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आकर्षित झाले, समाजशास्त्राच्या क्षेत्रात सिडने वेब आणि बिट्रियास वेष हे दांपत्य दिगंगड मानल्या जात होते. इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांना भेटण्याचा विचार बाबासाहेबांच्या मनात पक्का होता. म्हणून त्यांनी सेलिग्मनचे पत्र घेतले. सिडने वेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांची मदत घेतली. त्याच काळात जागतिक क्षितिजावर एक राज्यशात्रज्ञ म्हणून हॅरॉल्ड लास्की उदय पावत होते. त्यांच्या राजकारणाचे व्याकरण, ग्रामर ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथाला अभ्यासल्याशिवाय आजही राज्यशात्राचे अभ्यासक पुढे जाऊच शकत नाहीत. असा लास्कीच्या समोर लंडन युनिव्हर्सिटीत बाबासाहेबांनी रिस्पॉन्सिबिलिटिए ऑफ जरिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्मेंट इन इंडिया या विषयावर आपले विचार मांडून गदारोळ उडवून दिला. त्यामुळे प्रा. लास्की त्यांच्यावर कोपले. ते म्हणू लागले “आंबेडकरांची विचारसरणी एखाद्या अस्सल राजकीय क्रांतिकारक प्रचाराला शोभणारी आहे.” त्यामुळे आंबेडकरांना एक तर हिंदी क्रांतिकारक किंवा ‘रशियन क्रांतीचा प्रचारक’ म्हणून बराच काळ ओळखले गेले. त्याची बारी-वाईट किंमतही डॉ आंबेडकरांना मोजावी लागली. बाबासाहेबांच्या जीवनातील अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. बाबासाहेब अर्थशास्त्र,राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञान या सर्वांचा एखाद्या अधाश्यासारखा अभ्यास का करीत होते? त्याचा त्यांचा व्यक्तिगत जीवनात काय फायदा होता ? या सर्व धडपडीमागे एक सूत्र होते. बाबासाहेबांना मानवी जीवनाचा साम्रज्ञाने अभ्यास करायचा होता. विसाव्या शतकात प्रगतीच्य टोकावर गेलेला माणूस, त्याने बदलेल जुना समाज, त्याने निर्मलेली नवी संस्कृती, त्याने केलेली प्रगती, त्याच्या भविष्यातबद्दल इच्छा आणि आकांक्षा हे सारे त्यांना नम्रपणे, परिश्रमपूर्वक घ्यावयाचे होते. पण कशासाठी? केवळ अभ्यासासाठी ? कि अन्य कारणासाठी? या प्रश्नांची उत्तरे आहेत-भारतासाठी, भारतातल्या माणसांसाठी, त्यांना सुसंस्कृत आणि समृद्ध बनविण्यासाठी. त्यामुळेच प्रगत पाश्चिमात्य माणसाशी, त्याच्या आधुनिक समाजव्यवस्थेशी, त्याच्या लोकशाही शासनाशी आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीशी भारतासारख्या दरिद्री, कर्मठ आणि धार्मिक मनोवृक्तीच्या माणसांची नाळ कशी जोळायची याचा ध्यासच जणू बाबासाहेबानी घेतला होता. त्यांचे सारे पुढील आयुष्य हे या ध्यासाला वास्तवात आणण्यासाठी केलेल्या महत्वप्रयत्नांचा तपशील आहे. त्यामुळेच त्यांना संस्कृतीरक्षक वैरी मानत होते आणि शोषणाचे समर्थक शत्रू. बाबासाहेबांनी या कशाचीच तमा बाळगली नाही. त्यांनी विवेकाच्या साहाय्याने आणि संघटित शक्तीच्या जोरावर इथल्या विषम आणि असंस्कृत वास्तवावर प्रहार केले. त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल असूया बाळगणारे अनेक जण त्याही काळात होते, आजही आहेत.
लेखक- डॉ रावसाहेब कसबे