रिपब्लिकन पक्ष

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – २

रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या वारशाचा प्रभाव गेली चाळीस वर्षे इथल्या जनमानसावर कायम असल्यानेच रिपब्लिकन नेत्यांवर दबाव आहे. त्यामुळे रिपब्लिकन नेतृत्व एकीकडून त्यांच्या देदीप्यमान वर्षाच्या प्रभावाने आणि दुसरीकडून जनतेच्या दबावाने स्वतःचा मार्ग चोखाळू शकत नाही. इतिहासाने त्यांच्यावर घातलेली हि सर्वात गंभीर अशी मर्यादा आहे. महापुरुषांच्या छायेत वावरणारी माणसे सुरक्षित निश्चित असतात, परंतु ती स्वतंत्र असतातच असे मात्र नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील १९१३ ते १९१६ आणि १९२० ते १९२३ हा कालखंड फार महत्वाचा आहे. या काळाने बाबासाहेबांच्याकडून जे निष्ठूरपणे घेतले आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना जे उदारपणे दिले त्याचा शोध हि जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या काळातील ज्या गोष्टीना माझ्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. त्याची केवळ नोंद या ठिकाणी करण्याचा विचार आहे. कदाचित त्याच्यातून जर एखादे जीवनदृष्टीविषयक सूत्र विकसित झाले तर ते अभ्यासकांना आणि नेतृत्वालाही थोडे फार उपयोगी पडेल त्यामुळे तर आनंद वाटेल. बाबासाहेब साधारणतः साडेपाच वर्षे शिक्षणानिमित्ताने त्याकाळच्या जगातील सर्वात प्रगत देशात वास्तव्यासाठी  होते. अर्थात त्या काळात इतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षणही युरोप-अमेरिकेतच झालेले होते. मग या दोहोत मूलभूत फरक काय होता ? इतर भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन कुठल्यातरी चळवळीत सामील होत होते किंवा पदव्या घेऊन भारतात परतत होते. बाबासाहेबांचे उद्धीष्ट्च वेगळे होते. त्यांच्या नावापुढे जेवढ्या पदव्या आहेत तेवढ्या जगातील क्वचित कुना राजकारणाच्या नावापुढे असतील,हे खरे. परंतु त्यांनी पदव्यांसाठी अभ्यास केला नव्हता तर अभ्यासासाठी ते पाडव्याच्या भानगडीत पडलेले दिसतात. त्यांच्या अभ्यासाचे विषय आणि क्षेत्रे बघितली तरी या सत्याची आपल्याला खात्री होते,एकाद्या विषयाचा अभ्यास करायचे मनात आले कि बाबासाहेब त्यात पदवी घेण्याचा विचार करीत. हि त्या काळातील शिक्षणाची उफराटी पद्धत होती.
गरीब व मागासलेल्या देशाची तसेच जातिसंस्था आणि अस्पृश्यतेची पाश्वभुमी असणारा बाबासाहेबांसारखा विद्यार्थी पहिल्यांदाच परदेशात गेल्यावर  त्याची मनस्थिती कशी असेल ? बाबासाहेबांनी खार म्हणजे ते सारं लिहून ठेवायला हवं होत. परंतु ते राहून गेले. बाबासाहेब पाश्चिमात्य जगातील माणसे समजून घेत होते. या माणसांनी स्वप्रयत्नानी अर्जित केलेल्या वैभवाचे,प्रतिकूल निसर्ग आणि कर्मठ व्यवस्था यांच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाचे आणि त्यांनी विकसित केलेल्या वैश्विक संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण करीत होते. या सर्व गोष्टी त्यांनी ज्या जोरावर केल्या त्या सर्व ज्ञानशाखा पुढे बाबासाहेबांच्या आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय बनल्या. मानवी जीवनातील प्रत्येक ज्ञानशाखेतील जगमान्य व्यक्तींशी बाबासाहेबांनी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केला. कधी त्यांच्याशी वाद-विचार केले, कधी त्यांचा रोष पत्करला. यादृष्टीने बाबासाहेबांच्या जीवनातील काही तपशील उदबोधक ठरेल असाच आहे.

 
संदर्भ- रिपब्लिकन पक्ष ऐक्य,वास्तव आणि भवितव्य 
लेखक- डॉ रावसाहेब कसबे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *