जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या परिवर्तनामुळेच अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले गेले. याच जोरावर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने पहिला बौद्ध विवाह लावला, आणि शतकानुशतके बुरसटलेल्या चालीरीती, प्रथांना तिलांजली दिली. कुही तालुक्यातील वामनराव मोटघरे व लष्करीबाग येथील दमयंती रामटेके या नवदाम्पत्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
वाचा : बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड
बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर एक नवी चेतना निर्माण झाली. जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसात भेद करतो, त्या धर्माच्या चालीरीतीने विवाह करायचा नाही असे ठरले. यासाठी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले नामदेवराव नागदेवते, पुंडलिक गौरखेडे, श्रीराम रामटेके यांनी वामनराव मोटघरे व दमयंती रामटेके यांचा विवाह बौद्ध पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. विवाहाची तारीखही जाणीवपूर्वक निवडण्यात आली. पहिल्यांदाच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायचित्र असलेल्या पत्रिका वाटण्यात आल्या. बाबासाहेबांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे यासाठी नागदेवते, गौरखेडे, रामटेके हे १३ ऑक्टोबर रोजी बर्डीच्या श्याम हॉटेलकडे निघाले. परंतु त्यांना बाहेरच थांबविण्यात आले. ब-याच प्रयत्नानंतर ते माईसाहेब आंबेडकरांना भेटू शकले. परंतु बाबासाहेबांची प्रकृती बरोबर नसल्याचा निरोप मिळाल्यावर ते माघारी फिरले.
वाचा : जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण
या विवाह सोहळ्यासाठी महास्थवीर चंद्रमणी यांनी होकार दिला होता. १४ ऑक्टोबरला या दोन्ही कुटुंबीयांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विवाहाचा दिवस १५ ऑक्टोबर आला. वधू-वर पांढरे शुभ्र वस्त्र घालून उभे होते. महास्थवीर चंद्रमणी यांनी या उभय वर-वधूला समोरासमोर उभे केले. त्रिशरण-पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या मंगल परिणयाला ४० हजाराहून लोक उपस्थित होते. आज हे दाम्पत्य नाही. त्यांचा मुलगा राजरतन मोटघरे हा विवाह सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत जिवंत करून सांगतात.