लेखकांचे जग

जेव्हा सावित्रीबाई बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करतात…

ज्योतिबा आणि सावित्रीबाई या जोडप्याच्या हातून स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि इतर सामाजिक जागृतीचे जे महान कार्य झाले. त्या मागची मुख्य शक्ती होती सगुणाबाई क्षीरसागर. या दोघांना घडवणाऱ्या या स्त्रीबद्दल थोडे सांगितले तर ते वावगे ठरणार नाही. सगुणाबाई या नात्याने ज्योतिबाच्या मावसबहीण. पण नऊ महिन्यांतच आईविना पोरक्या झालेल्या ज्योतिबाचा त्यांनी जिजाबाईंच्या डोळस मायेने सांभाळ केला. शिक्षणाची आवड असणाऱ्या गोविंदरावांनी तल्लख बुद्धीच्या ज्योतिबाना ‘चर्च ऑफ स्कॉटलंड’ मिशनच्या शाळेत घातले. पण बहुजन समाजातल्या मुलाने शिक्षण घ्यावे, याचे सनातनांना वैषम्य वाटून त्यांनी गोविंदरावांना वाळीत टाकण्याची, मुलाला शिकवण्याचे धर्मबाह्य वर्तन हातून घडल्यामुळे पाप लागण्याची भीती घालून ज्योतिबाना शाळेतून काढायला लावले. ज्योतिबाची हुशारी माहीत असलेल्या सगुणाबाईंना फार खेद वाटला. आपल्या जोतीने खूप शिकावे आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे समाजाची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी स्वस्थ न बसता मित्रांकरवी गोविंदरावांचे मन वळवले. कलेक्टरांची चिठ्ठी मिळवून ज्योतिबाना घेऊन त्या बुधवार वाड्यातल्या प्रसिद्ध शाळेत गेल्या आणि तिथे ज्योतिबाना प्रवेश मिळवून दिला. या शिक्षणाने ज्योतिबाच्या तल्लख बुद्धीस आणखी धार चढून सामाजिक काम करण्याचा सगुणाबाईंनी त्यांच्या मनात पेरलेला विचार वाढीस लागला. याचे श्रेय सगुणाबाईंच्या दक्षतेसच द्यायला हवे. ज्योतिबाना मराठी येऊ लागल्यावर स्वतः सगुणाबाई ज्योतिबाकडे मराठी शिकू लागल्या. नवरा वारल्याने आणि माहेरीही कुणी न उरल्याने त्या जॉन या मिशनऱ्याकडे मुलांना सांभाळायचे काम करीत. त्या उत्तम इंग्रजी बोलत. सावित्रीबाईंनाही आपल्याबरोबर शिकवावे असा त्यांनी ज्योतिबाकडे आग्रह धरला. शेतावर काम करताना जेवणानंतरच्या विश्रांतीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली जमिनीच्या पाटीवर ते त्यांना शिकवू लागले. त्या दोघींचे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यावर नॉर्मल स्कूलच्या मिचेलबाईंनी दोघांची परीक्षा घेतली. त्यात या दोघींची प्रगती इतकी दिसली की, मिचेलबाईंनी त्यांना एकदम ट्रेनिंगच्या तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला. इ.स. १८४७ मध्ये ज्योतिबाच्या भावी शाळांमधल्या या दोन्ही शिक्षिका ट्रेनिंग घेऊन तयार झाल्या. इ.स. १८४८ मध्ये ज्योतिबानी महारवाड्यात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाईंनी शिक्षिकेचे काम केले व त्याच्याच जोडीने मनापासून त्यांची सेवा केली. इतकेच नव्हे, तर जॉनसाहेबांच्या घरी नोकरी करून मिळवलेली तुटपुंजी मिळकतही समाजकार्यातल्या अडीअडचणींच्या वेळी त्या ज्योतिबाना देत. अशा या आपल्या प्रेमळ पण कर्तव्यकठोर सगुणाबाई ऊर्फ ‘आऊ’बद्दल ज्योतिबाच्या मनात नितान्त आदर व प्रेम असले तर नवल नाही. पण सावित्रीबाईंनाही या थोर स्त्रीबद्दल किती प्रेम व आदर होता, हे त्यांनी त्यांच्यावर रचलेल्या कवितेतून दिसून येते. ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासारख्या तेजस्वी रत्नांना सामाजिक कार्याच्या प्रेरणेचे पैलू पाडून ती समाजाला अर्पण केली याबद्दल साऱ्या महाराष्ट्राने या सावित्री-ज्योतिबाच्या ‘आऊ’चे ऋण मानले पाहिजे.
सगुणाबाईबरोबर ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केल्यावर ज्योतिबानी मुलीसाठी काढलेल्या भिडे वाड्यातल्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.

पण त्या काळी शिक्षिकेचे काम करणे ही गोष्ट सोपी नव्हती. त्यांचा नवरा मुलींना शिक्षण देण्याचे एक ‘पातक’ करत होता, त्याच्याच जोडीने मुलींच्या शाळेत शिकवायला जाण्याचे दुसरे ‘पातक’ सावित्रीबाईही करू लागल्यावर त्यांच्या छळाला पारावारच राहिला नाही. त्या शाळेत जाऊ लागल्या की ब्राह्मणांनी त्यांना खडे मारावे, अचकटविचकट शिव्या द्याव्या, वेळप्रसंगी शेणाचे गोळेही अंगावर फेकावे, चारित्र्याबद्दल संशय घ्यावा. पण हा सगळा छळ शांतपणे सोसून सावित्रीबाईंनी आपले शिकवण्याचे काम चालूच ठेवले.

एकदा तर त्यांच्यावर फारच कठीण प्रसंग आला. एक आडदांड इसम शाळेत जात असताना वाट अडवून उभा राहिला आणि शाळा बंद करतेस की अब्रू घेऊ, अशी धमकी देऊ लागला. प्रसंग फार बाका. पण आपल्या कार्यावरच्या व ज्योतिबावरच्या निष्ठेने त्यांना धैर्य दिले. सावित्रीबाईंनी खाडकन दोन थपडा त्याच्या कानशिलात लगावल्या. सावित्रीबाईंकडून प्रतिकार होईल ही अपेक्षाच नसलेल्या त्या धटिंगणाचे त्यांच्या तेजस्वी रूपाच्या दर्शनाने अवसानच गळाले आणि तो तोंड काळे करून पळून गेला. तेव्हापासून या तेजस्वी कर्तव्यकठोर सावित्रीबाईंच्या कुणीही वाटेस गेले नाही. पण गोविंदरावांचे कान फुंकून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यात मात्र सनातन्यांना यश आले. एका मुसलमान मित्राने उस्मान शेख यांनी त्या दोघांना आपल्या घरात राहण्यास जागा दिली. एवढेच नाही, तर स्वयंपाकास लागणारी जुजबी भांडीकुंडीही दिली. शाळेत येणाऱ्या मुलींनाही असाच त्रास होई. पण वेळोवेळी पालकांना भेटून त्यांची समजूत काढण्याचे काम सावित्रीबाई करीत. त्यामुळे मुलींची संख्या वाढू लागली. इ.स. १८५१ मध्ये त्यांच्या शाळेतल्या मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्या वेळी मेजर कँडी यांनी शेरा दिला की “शाळेतील मुलींची बुद्धिमता आणि प्रगती पाहून फार समाधान वाटले.” मुलींची शिक्षणातली प्रगती पाहून मुलांनाही शाळेत पाठवण्यात येऊ लागले. फुले दाम्पत्याने शाळा उघडण्याचा सपाटाच लावला. इ.स. १८५२ पर्यंत पुणे व आसपासच्या भागात उघडलेल्या शाळांची संख्या १८ झाली होती. सावित्रीबाईंनी केवळ शिक्षिकेचेच काम केले नाही, तर शिक्षणशास्त्रातले अनेक मूलगामी विचार आपल्या अनुभवावरून मांडले. नुसत्या शिक्षणाच्या शाळा उघडण्याने सावित्रीबाई आणि ज्योतिबाना समाधान वाटत नव्हते. समाजातल्या बालविधवांचे जिणे, कुमारी मातांची स्थिती त्यांना अस्वस्थ करीत होती. एके दिवशी रात्रीच्या वेळी ज्योतिबा लकडी पुलावरून फिरायला जात असताना पुलाच्या कठड्यावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न कुणीतरी करीत असल्याचे दिसले. ज्योतिबानी घाई करून त्या व्यक्तीस रोखले. पाहतात तो ती एक पुरुषाच्या वासनेची शिकार बनून गरोदर असलेली विधवा आहे असे त्यांना आढळून आले. त्या मुलीची समजूत घालून, धीर देऊन ज्योतिबा तिला आपल्या घरी घेऊन आले व त्या काशीबाईस सावित्रीबाईंच्या हवाली केले. सावित्रीबाईंनी तिची नीट काळजी घेऊन तिचे बाळंतपण केले आणि जन्मलेल्या मुलाची नाळ स्वतःच कापून १२व्या दिवशी त्याचे ‘यशवंत’ असे नाव ठेवले.

वाट चुकलेल्या बालविधवांची जी केविलवाणी स्थिती होती त्यावर विचार करून सावित्रीबाई आणि ज्योतिबानी २८ जानेवारी १८५३ रोजी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली. आपल्या घराजवळच्याच उस्मान शेख यांच्या बखळीत त्यांचे कार्य चालू झाल्याची जाहिरात केली. ती अशी:

“कोणा विधवेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती गरोदर राहिली तर तिने या गृहात जाऊन गुपचूपपणे बाळंत होऊन जावे.” अशी जाहिरात करण्याचे धैर्य सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यासारखे खंबीर व क्रांतिकारक सुधारकच दाखवू शकतात. कारण या बाबतीत जे सामाजिक परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे त्यासाठी करावयाचा आचार त्यांनी पूर्ण विचारांतीच ठरवलेला असतो. महाराष्ट्रातले हे पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह होय. या ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’तल्या मुलांची सावित्रीबाई किती काळजी घेत हे पुढील उताऱ्यावरून दिसून येईल. “जोतीरावांच्या पत्नी सावित्रीबाई त्या गृहातल्या मुलांची अविरतपणे वात्सल्याने सेवा करीत. लालनपालन करीत. त्यांना स्वतःला अपत्य नव्हते. तथापि या माउलीने आपल्या दयाळू, उदार स्वभावाला अनुसरून त्या अर्भकांचे अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने संगोपन केले.” या गृहातल्या कामाबद्दल लोकहितवादी, नवरंगे, मामा परमानंद या सुधारकांनीही चांगले उद्गार काढलेले आहेत.

– संदर्भ : सावित्रीबाई ज्योतिबा फुले जीवनकार्य – शांता रानडे
– – – – – – – – – – – – – – – –  – – – – – – – – – – – – –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 3   +   10   =